पब्लिक टाॅयलेटसाठी महिलांचा एल्गार, नागपूर सिटिझन्स फोरमचे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी आंदोलन

नागपूर – लोकसंख्येच्या तुलनेत नागपूर (Nagpur) शहरात प्रसाधन गृहांची संख्या, सार्वजनीक मुतार्‍यांची दयनीय स्थिती, पब्लिक टाॅयलेटच्या अभावी महिलांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न व सरकारी कार्यालयातील अस्वच्छ वाॅशरुम्स या मुद्यावर नागपुरातील महिलांनी एल्गार केला आहे. नागपूर सिटिझन्स फोरमच्या (Nagpur Citizens Forum) नेतृत्वात व्हेरायटी चौकात आज लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या, महाविद्यालयीन युवती, नोकरदार महिला व विविध बाजारपेठांमध्ये काम करणार्‍या महिला प्रातिनिधीक स्वरुपात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

स्वच्छ व सुरक्षित प्रसाधन गृहांची मागणी करणारे फलक हाती घेत आंदोलनकर्त्या महिलांनी नागपूर महानगर पालिका व जनप्रतिनिधींविरोधात घोषणा देत रोष प्रकट केला. गेल्या वर्षभरापासून नागपूर सिटिझन्स फोरमने राईट टू पी हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जनजागृती, पब्लिक टाॅयलेटची तपासणी व जनमत संग्रह असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार महिला, आॅटो रिक्षा चालक व फुटपाथ दुकानदारांनी या उपक्रमांमध्ये भाग घेत मनपा प्रशासनाकडे स्वच्छ व मुबलक स्वच्छता गृहांची मागणी केली. स्वच्छता गृहांच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात जे वास्तव पुढे आले त्याची माहिती मनपा प्रशासनाला विविध माध्यमातून देण्यात आली. वर्ष लोटले तरी महानगरपालिका या संदर्भात कुठलेही सकारात्मक काम करतांना दिसत नाही त्यामुळे सिटिझन्स फोरमने महिला दिनाचे औचित्य साधत पालिकेविरोधात लक्षवेधी आंदोलन केले.

लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक वस्तीत व मार्केट एरियामध्ये प्रसाधन गृहांची निर्मिती, महिलांसाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वाॅशरुमची निर्मिती व सरकारी कार्यालयांमधील प्रसाधन गृहांच्या सद्य स्थितीत सुधारणा करा अशा तीन प्रमुख मागण्या फोरमच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात योगिता शेंडे, जयश्री गाडगे, रेणूका लांडे, पूजा जांगडे, मीना कुंभारे, अमृता अदावडे,अपूर्वा पित्तलवार, शिप्रा विंचूरकर, आरती नान्हे, प्रियंका कारेमोरे, वैष्णवी गिरी, मनिषा राजवाडे, रजत पडोळे, वैभव शिंदे पाटील, अभिजीत झा, अभिजीत सिंह चंदेल, अमित बांदूरकर, गौरव ठाकरे, प्रतिक बैरागी, शिवम उमरेडकर, प्रज्वल गोड्डे आदी उपस्थित होते.

या शहरात मेट्रोचा विस्तार होत आहे, उड्डाण पूल बनताहेत, सिमेंटचे रस्ते होत आहेत. करोडो रुपये खर्च करुन म्युजिकल फाउंटेनचा देखावा उभा केला गेलाय. पण दुर्देव आहे कि आमची महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी चांगले युरिनल्स व प्रसाधन गृह उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे मत सिटिझन्स फोरमचे समन्वयक रजत पडोळे यांनी व्यक्त केले आहे. प्रसाधन गृहांची निर्मिती हे महानगरपालिकेचे काम आहे मात्र हजारो कोटी रुपयांचे बजेट असूनही मनपा सीएसआर फंड आणि एनजीओकडे हात पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या 10 दिवसात महानगरपालिकेने यासंदर्भात काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर जी-20 देशांच्या सिविल सोसायटीपुढे नागपुरातील अस्वच्छ व दयनीय स्थितीतील प्रसाधन गृहांचे प्रदर्शन मांडण्याचा इशारा नागपूर सिटिझन्स फोरमने दिला आहे.

महिलांच्या प्रश्नावर कायदेशीर लढा देणार्‍या एड. स्मिता सिंघलकर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सिंघलकर यांनी शहरातील पब्लिक टाॅयलेट्सच्या विषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 11 वर्ष लोटली तरी महानगरपालिका या संदर्भात काही ठोस काम करायला तयार नसल्याचा आरोप सिंघलकर यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रसाधनगृहे अस्वच्छ, असुरक्षित व आरोग्यासाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांसाठी सार्वजनीक प्रसाधन गृहांची सोय नसणे ही शहराच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब असल्याचे त्या म्हणाल्या. येत्या काळात महिलांचे मोठे आंदोलन उभारुन महानगरपालिकेला पब्लिक टाॅयलेट्सची सोय करण्यास बाध्य करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.