यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख, अजितदादा म्हणाले…

रत्नागिरी : शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. याच डायरीतील एक उल्लेख राज्यभरात सध्या चर्चिला जात आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर आता शिवसेनाला सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एजन्सी त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. अशा चौकशा होत असतात. यशवंत जाधव यांनीच याबाबत उत्तर दिलं आहे. मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो, असं त्यांनी सांगितलं. काही लोकं आपल्या आईला मातोश्री म्हणतात. म्हणतात ना की नाही म्हणत? ते स्वत: म्हणतात त्याला पुन्हा पुन्हा का अधिक उकळी देण्याचं काम करता, असंही अजित पवार म्हणाले.