महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अलंकृता बिचुकलेंच्या नेतृत्वाखाली २८८ जागा लढवणार- अभिजीत बिचुकले

आज महाराष्ट्रात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्यभिषेकाचा उत्साह सुरू आहे. अशातच या खास दिनानिमित्त बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा लढणार असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, “राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बालवाडी ते दहावीपर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे,” अशी मागणी बिचुकले यांनी सरकारकडे केली आहे.

“राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरता. मग, शिवाजी महाराजांचे किती गुण तुमच्यात आहेत. हा प्रश्न सर्व नेत्यांना आहे. गरज पडली की शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं,” असे म्हणत अभिजीत बिचुकले यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली.

“महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अलंकृता बिचुकलेंच्या नेतृत्वाखाली २८८ जागा लढण्याचा संकल्प शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त करत आहे. होतकरू आणि राज्याचा कळवळा असलेल्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आमदारकीची तयारी करावी,” असे आवाहनही बिचुकले यांनी केलं.