मनसेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख; संजय राऊत यांची पहिली प्रतिकिया, म्हणाले,…

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार आहे.. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे (Raj Thackeray) अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

दरम्यान,मनसेच्या शिवसेना भवनासमोरील काही पोस्टरमध्ये तर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे.

दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशात लोकशाही आहे. या देशात सामान्य नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाही वर विश्वास आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. त्यामुळे बहुमताच्या खेळावर अवलंबून राहू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.