आदिपुरूष आणि आधुनिक भारत : डॉ. अभिराम दीक्षित यांचा अभ्यासपूर्ण लेख जरूर एकदा वाचायला हवा 

डॉ. अभिराम दीक्षित – आदिपुरूषचा (Adipurush) नवा ट्रेलर पाहिला . त्यावर सुरु असलेल्या चर्चा पाहिल्या. त्या चर्चेमागे मोठे ऐतिहासिक गूढ आहे  म्हणून त्यावर लिहायचे ठरवले. सध्याच्या हिंदुस्थानात तुलसीरामायण लोकप्रिय आहे . हे मूळ रामायणाचे मध्युगीन व्हर्जन आहे . मूळ वाल्मीकी रामायणातल्या पात्रावर तुलसी दासाने मध्युगीन नैतिक संस्कार केले आणि तुलसी रामायण सिध्द झाले . त्या काळी एका अर्थाने ही क्रांतीच होती. धर्माला काळानुसार अपडेट करुन घेणे होते. पदर ओढणारी मध्युगीन सीता मूळ वाल्मीकी रामायणात नाही . पण आज आधुनिक वर्तमानकाळापर्यत हिंदू मनावर तुलसी दासाचे मध्युगीन रामायणच राज्य करते आहे. ऐतिहासिक मूळ वाल्मीकी रामायणातली नैतिक मूल्ये , पात्रे , पात्रांचे कपडे , त्यांचे संवाद याबद्दल बहुसंख्य हिंदूना काही कल्पनाच नाही.

उत्तर भारतात गावोगाव अदाकारी करणाऱ्या रामलीला तुलसी रामायणावरच बेतलेल्या आहेत. टीव्हीवरची अतिशय जबरदस्त प्रसीद्ध झालेली आणि भारताच्या घराघरात भक्तीने पाहिली गेलेली – रामानंद सागर यांची टीव्ही मालिका देखील  या तुलसी रामायणावरच होती. या सर्वामुळे   मूळ रामायण विस्मृतीत जाऊन : तुलसी दास + रामानंद सागर यानी सांगितलेले रामायण हे हिंदू मनाने स्टॅंडर्ड म्हणून मान्य केले आहे. हे इतके खोलवर गेले आहे की हिंदू मनात जेव्हा रामाचा विचार येतो – तेव्हा शेकडा नव्वद टक्के लोकांच्या मन: पटलावर सिरियल मधल्या अरुण ग़ोविलचे चित्र उभे राहते. अयोध्येतल्या रामलल्ला च्या मंदिरासमोर प्रभू श्रीराम म्हणून जी चित्रे विकली जातात ते अरुण गोविलचे फोटो असतात. २०११ साली मी स्वतः अयोध्येला गेलो होतो तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले दृश्य आहे . काही फोटो कॉमेंट मध्ये दिले आहेत.

सिरियल मधली वानरसेना गोरी गोमटी लाल ओठांची आहे . मूळ वाल्मीकी रामायणातले वर्णन बुद्धिमान एप्स सारखे आहे. आदिपुरूष सिनेमातली वानरसेना थोडी मूळ रामायणाकडे झुकलेली वाटते . बहुदा हे बहुसंख्य हिंदूना मान्य होणार नाही !

सिनेमाच्या ट्रेलर मधल्या हनुमंताची गदा गुळगुळीत आहे. कुस्तीत पैलवानाना देतात तसली पाहिजे होती. गंमत म्हणजे मूळ वाल्मीकी रामायणात – हनुमंताकडे गदाच नाही. मूळच्या वाल्मिकी रामायणातल्या सुंदरकांडात – अशोक वनाच्या दरवाज्यावर  उभा राहून महाबली हनुमान कडवी झुंझ देउन – अक्षरश: हजारो राक्षसांचा चोळा मोळा करुन टाकतो याचे प्रत्यकारी वर्णन आहे. त्यावेळी हनुमंत अशोक वनाच्या दारातला कोयंडा काढून त्याने राक्षसाना बदडून काढतो याचे वीरश्रीयुक्त वर्णन आले आहे. वाल्मीकी रामायणात वापरलेला शब्द आहे “परिघ” ( संदर्भ : ५-४२-४०). परिघ म्हणजे दार बंद करायचा कोयंडा. या कोयंड्या च्या एका टोकाला छोटा गुळगुळीत गोल असतो वजन म्हणून . केवळ एव्हढ्या एका प्रसंगापुरते गदेसारखे काहीतरी हनुमानाच्या हातात दिसते . बाकी इतर कोणत्याही प्रसंगात वाल्मीकी रामायणात गदा सदृश हत्याराचा उल्लेख नाही. मूळ वाल्मीकी रामायणात गदा शब्द वापरुन एकदाही हनुमंत लढला नाही. याउलट मारुतीरायास मुष्टियोद्धा म्हणून रंगविले आहे. मूळ वाल्मीकी रामायणातल्या वानरसेनेत कोणाकडेच गदा नाही. वानरसेनेची आवडती शस्त्रे कोणती तेही वाल्मीकी रामायणात अतिशय स्पष्टपणे वर्णन केले आहे. तो मूळ श्लोक असा –

शिला प्रहरणाः सर्वे सर्वे पर्वत योधिनः || १-१७-२५

नख दन्ष्ट्र आयुधाः सर्वे सर्वे सर्व अस्त्र कोविदाः |

दगड फेकून मारणे , झाडे उपटुन फेकणे , नखे , दात आणि पंजे हीच ज्यांची शस्त्रे आहेत ते वानरसेनेतले वीर सर्व प्रकारच्या अस्त्रविद्येत प्रवीण होते . इथेही गदेचा उल्लेख नाही आणि हे वर्णन अधिक बुद्धिमान ग्रेट एप्स शी जुळणारे आहे. वानर चा अर्थ तोच.

महाबली हनुमान देखील धनुर्विद्येत प्रवीण असल्याचे उल्लेख मूळ रामायणात मिळतात. सिरियल मधले हनुमंत एकदाही धनुष्य उचलत नाहीत. इतिहासात गदा ही पैलवानकी शी जोडली गेली पुढे कधीतरी हनुमंताशी जोडली गेली . इतकी घट्ट जोडली गेली की आज गदेशिवाय हनुमंताची मूर्ती मिळणार नाही .

मूळ रामायण बदलत गेले. त्याची अनेक व्हर्जन्स आली. तुलसीदासाने महान क्रांती करुन त्वाल्मीकी ऋषींच्या मूळ रामायणाला त्यांच्या  काळानुसार ( मध्ययुग ) – रामायण अपडेट करुन घेतले. केवळ शस्त्रे अस्त्रे गदा नव्हे तर नैतिक मूल्ये देखील काळानुसार बदलत जातात. धर्माला काळानुसार बदलावे लागते. हेच यातले सूत्र आहे. आणि हिंदूंच्या दृष्टीने हे अतिशय अभिमानास्पद आहे.

आज मध्ययुग मागे पडले आहे. आधुनिक भारताचा हा काल आहे. ओम् राऊत यांचा सिनेमा वाल्मीकी रामायण +  हॉलिवुड एपिक्स + आधुनिक राष्ट्रवाद आणि सध्याच्या राजकारणातली रग याचे मिश्रण असावा असे ट्रेलर वरुन वाटते. “भारताच्या लेकींवर नजर टाकायची कोणाची हिम्मत होऊ देऊ नका“  वगैरे डायलॉग रामाच्या तोंडी दिसतात. अशा प्रकारचा राष्ट्रवाद रामायण काळी नव्हता. रामायण हे दोन देशातले युध्द नव्हते . पण आदिपुरूष हा राष्ट्रवादी सिनेमा वाटतो !

मूळ रामायणातली नितीमूल्ये किती आजच्या सश्रद्ध हिंदूना रुचतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. मूळ रामायण अनेकदा नव्या स्वरूपात दाखवले गेले आहे. सध्या यातले प्रसीद्ध व्हर्जन तुलसीरामायण + रामानंद सागर असे आहे. यापुढचे हॉलिवुड + राष्ट्रवादी रामायण लोक स्वीकारतील ? की तुलसीदासच्या मध्ययुगीन रामायणाला कवटाळून बसतील ?

ओम् राऊत कोणासाठी सिनेमा बनवतो आहे ? हे समजून घेतले पाहिजे. थ्री डी सिनेमा आहे . हॉलिवुड मधली वटवाघुळे आहेत . मल्टिप्लेक्स मधील इंग्रजी बोलणारे प्रेक्षक कदाचित याकडे नाविन्याने पाहतील . पण सर्व सामान्य हिंदूना हा बदल रुचेल ?  कदाचित हो . कदाचित नाही . दोन्ही पर्याय सारखेच इंटरेस्टिंग आहेत .

भारत बदलत गेला – रामकथा सांगायची पद्धत बदलत गेली . यापुढेही बदलत राहिल . धर्म असाच प्रवाही असला पाहिजे . त्यात चांगल्या वाईट दिशेचा विषय महत्वाचा नाही . प्रवाही असणे हा महत्वाचा विषय आहे.