पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले, साहेबांना विनंती केली, पण… प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं नेमकं कारण

मुंबई :  पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची  बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली.  या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ,प्रफुल्ल पटेल वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले होते.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. आम्ही गेल्या गेल्या शरद पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसेच ही बैठक पूर्वनियोजित नव्हती, अशी माहितीही त्यांनी दिली.