मी पराभूत केलेल्या उमेदवाराला अजितदादांनी ताकद देण्याचे काम केले – शिंदे  

Mumbai – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.  यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललाआहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला.

या सर्वांनी आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला असून रोज काही आमदार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एका बाजूला या आमदारांमधील काही आमदार संपर्कात असल्याच्या  बातम्या पेरल्या जात आहेत तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून या बातम्यांचे खंडन केले जात आहे. यातच आता कोरेगाव चे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

महाविकास आघाडीत असलेला घटकपक्ष राष्ट्रवादी आमचा परंपरागत विरोधक आहे. माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री यांचेकडून ताकद देण्याचे काम केले गेले म्हणूनचं महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती.असं शिंदे यांनी म्हटले आहे.