“तोकडे ड्रेस घालून शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती”, हिंदी चित्रपटांबद्दल स्पष्टच बोलल्या अलका कुबल

पुणे- वर्षानुवर्षे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी मराठी मालिका, नाटक, चित्रपट या सर्वच क्षेत्रात काम केलं. मराठीत काम केल्यावर अनेक अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवतात. पण अलका कुबल आजवर कुठल्याच हिंदी चित्रपटात भूमिका साकारताना दिसल्या नाहीत. त्यांना आजवर अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. त्यामागची त्यांची कारणं काय होती? याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच केला आहे.

प्रत्येकच कलाकाराला हिंदीमध्ये काम करावं असं वाटत असतं मग तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम करावंसं वाटत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर अलका कुबल म्हणालेल्या, ”माहेरची साडी’ चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या मात्र मी त्या नाकारल्या. मी ‘धार’ नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत होते. चित्रपटात ती भूमिका फारच महत्त्वाची होती. अनेकदा मी भूमिका निवडताना तिची लांबी न बघता त्याची गरज बघते. ते पात्र चित्रपटात किती महत्वाचं आहे ते पाहते. या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या सहकलाकाराच्या ओळखीचा असल्याने मी ती भूमिका केली. पण हिंदी चित्रपटासाठी वाट्टेल तसे तोकडे ड्रेस घालण्याची आणि शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती.”

“तसंच हिंदी चित्रपटात उगाचच छोटंसं पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून भूमिका करणं केव्हाही चांगलंच नाही का? मी दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्या ‘नया ज़हर’ नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. पण तो चित्रपट अजिबात चालला नाही. तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हेसुद्धा कोणाला कळलं नाही. त्यामुळे अशा भूमिका करून काहीही उपयोग नाही हे मला जाणवलं. त्यामुळे मी ठरवलं की हिंदी चित्रपटात अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाहीत,” असं अलका कुबल म्हणाल्या.