‘या विकृतींना त्यांनी मुक समर्थन दिले असे दिसते’, मिटकरींचा चंद्रकांतदादांवर निशाणा

मुंबई : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे.

शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकान बंद करायला भाग पाडले आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच तापले आहेत.

महाराष्ट्रात देखील आता या संतापजनक घटनेचे पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजप आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘छ.शिवाजी महाराजांनी’ हिंदूंची व्होट बँक तयार केली व नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असे म्हणणारे हिंदूंचे देशातील एकमेव नेते आज कर्नाटक मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत.यावरून या विकृतींना त्यांनी मुक समर्थन दिले असे दिसते. असा टोला अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.