मनसेची गांधीगिरी : माता सरस्वतीचा अपमान करणाऱ्या छगन भुजबळांना पाठविली सरस्वतीची मूर्ती 

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत येत असतात. आता देखील ते त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी भुजबळ यांनी माता सरस्वतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

‘शाळेत शारदा, सरस्वती मातेचा फोटो का? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, भुजबळ यांनी केलेल्या या जातीयवादी वक्तव्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. यातच आता छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने निषेध केला. तसेच भुजबळ यांच्या घरी सरस्वती मूर्ती पाठवून दिली आहे.

या मूर्ती बरोबर पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका खासगी कार्यक्रमात आपण महापुरुषांच्या बाबतीत वक्तव्य करताना विद्येची देवता म्हणून सकल हिंदू समाज ज्यांची पूजा करतो अशा सरस्वती देवीचा आपण अपमान केला. आज त्याच सरस्वती देवीचा तुम्हाला देखील आशीर्वाद लाभला आहे. म्हणून तुम्ही वाचू बोलू शकता आपण हे विसरलात. विद्यार्थ्यांना शिक्षणात सरस्वती मातेची प्रार्थना शिकवणारा आपला देश आहे आणि आपण या मध्ये चुकीच्या पद्धतीने मत मांडत आहात याचा आम्ही निषेध करतो.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा देखील आपण अपमान करीत आहात, कारण स्वतः क्रांतिज्योतींचे हे वाक्य आहे “ही शाळा नाही तर हे सरस्वती देवीचं मंदिर समजून उपासना करा”. धर्मात आधीच अधर्मी लोकांचा धुमाकूळ चालला असताना आपण या प्रकारे वक्तव्य करणं आपल्या सारख्या उच्च पदाच्या व्यक्तीमत्वाला शोभत नाही. या मुळे असंख्य हिंदू बांधवांची मनं दुखावली गेली आहे तरी आपणास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सरस्वतीची प्रतिमा पाठवत आहोत तरी आपण हिंदू बांधवांची माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त करीत माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.