Andheri East Bypoll Election : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद?

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा देण्यावरुन कॉंग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील काही कॉंग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची वोटबॅंक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणूकीत फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला असतांना मुंबई महानगरपलिका निवडणुकीअगोदर काँग्रेसला वोट बॅंक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही प्रश्न आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.