योद्धा उतरणार पुन्हा मैदानात, दारूविक्री निर्णयाविरोधात अण्णांचा उपोषणाचा निर्णय !

अहमदनगर : राज्य सरकारने दुकांनामध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. दारू विक्री करण्यासाठी परवानगी दिल्याने विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी त्यांनी येत्या १४ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

दुकानात वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की, या निर्णयामुळे मुलांवर राज्यातील भविष्यात जी आमची खरी संपत्ती आहे. यामध्ये भविष्यातील महान व्यक्ती होणार आहे. युवाशक्ती ही राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी। या युवतींवर या वाईनच्या वातावरणाचा काय दुष्परिणाम होईल? एकुणच या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होईल, याचा विचार सरकारने केलेला दिसून येत नाही.

वाईन विक्रीच्या महसुलाचा तुम्ही मर्यादित विचार केला आहे, असं दिसून येत आहे. ज्या मध्ये तुम्ही सत्तेसाठी समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार केला नाही. अशी सत्ता काय कामाची आहे. तुम्ही लोकशाहीला पायदळी तुडवीत आहेत. लोकशाही ही आपल्या लोकांची आहे. ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही, असंही अण्णा हजारे म्हणाले.

राज्य सरकारने दारू विक्री करण्याची परवानगी दिल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी यावर टीका केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे.