काही शक्तींकडून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जाती – धर्माचे विष पेरण्याचे काम – अजित पवार

कोल्हापूर – अलीकडच्या काळात राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जाती – धर्माचे विष पेरण्याचे काम सुरू केले आहे असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी कोल्हापूरच्या संकल्प सभेत केला.

कोरोना संकटकाळात लोकांना सावरण्याचे काम सरकारने केले. आर्थिक चक्र बिघडले होते. रोजगार गेले त्यामुळे पुन्हा सावरण्याचे काम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) याच्या माध्यमातून सरकार करतेय. जास्त वेळ कोरोना काळात गेला त्यामुळे काळजी घेत काम करायचे आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते. मात्र महाविकास आघाडीला यश मिळाले त्याबद्दल हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले.

धर्मधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला बाजूला करण्याचे काम करण्यात आले. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे २० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आता दोन लाखांपर्यंत कर्जमाफ केल्याशिवाय थांबणार नाही असे सांगतानाच अठरा पगड जातींना उभं करण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात ज्या घटना घडत आहेत त्यातून तुमच्या – माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय. महागाई (Inflation) वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. याकडे लक्ष जाऊ नये म्हणून प्रयत्न होतोय. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारही पाठीशी आहे काळजी करु नका असा शब्द अजित पवार यांनी दिला.

सध्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय त्याला बळी पडू नका. विकासावर बोला हे त्यांना सांगताना जनतेचे प्रश्न सोडवण्याचा विसर कार्यकर्त्यांना पडता कामा नये याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली. ओबीसींना (OBC) राजकीय आरक्षण मिळावे. उद्या कोर्टाचा वेगळा निर्णय आला तर चार महिन्यात निवडणूका होतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागतो. त्यामुळे निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तयार राहिला पाहिजे. आम्ही नेते त्यासाठी महाराष्ट्र ढवळून काढू परंतु सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गणात आणि जिल्हा परिषद गटात लक्ष ठेवले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

स्वतःचा विकासाचा अजेंडा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवला पाहिजे. माध्यमांशी बोलताना तारतम्य ठेवून बोलावे.पवारसाहेबांच्या विचारांवर काम केले पाहिजे. समाज दुखावेल असे वक्तव्य कुणी करु नये असे आवाहनही अजित पवार यांनी केले. नवीन ऊर्जा देण्याचे काम आपला नेता करत आहे. पुरोगामी विचारांचा नेतृत्व आपल्याकडे आहे. सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) लोकसभेत विविध प्रश्नावर आवाज उठवत असतात. शाहू महाराजांच्या या भूमीत एक नंबरचा पक्ष बनवुया असे आवाहन खासदार प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनी केले.