मुस्लीम देशात लाऊडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं? 

मुंबई – मनसेचे (MNS)  प्रमुख राज ठाकरे(raj Thackeray) यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला भोंग्याच्या प्रकरणावरून  राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असताना दुसऱ्या बाजूला आता जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी स्पीकरवर वाजवल्या जाणाऱ्या अजान विषयी (Azan on Speaker) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. मुस्लिमबहुल देशात जर स्पीकरवर अजान वाजवली जात नसेल तर भारतात हे असं का, असा सवाल पौडवाल यांनी या मुलाखतीत उपस्थित केला.

झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल म्हणाल्या, मी जगात अनेक ठिकाणी फिरले. पण आपल्या भारतात जे होतं, तसं घडताना मी इतर कुठेही पाहिलेलं नाही. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मात्र आपल्याकडे जबरदस्तीने या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातंय. मशिदीवर लाऊडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांनाही असं वाटतं की आम्हीसुद्धा असं का करू नये.इतर देशांचं उदाहरण देत त्या पुढे म्हणाल्या, मी आखाती देशांमध्ये प्रवास केला. तिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लीम देशात लाऊडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं? अजानप्रमाणेच देशातील इतरांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली तर त्यातून वाद आणखी चिघळेल. हे सगळं पाहून दु:ख होतं.