जलदगतीने सेवा पुरविणे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध :  आशिष पांडे

पुणे पूर्वच्या वतीने 'ग्राहक संपर्क अभियान' : सुमारे ७८ कोटी रुपयांचे कर्ज मंजुरी प्रस्तवांचे वाटप

पुणे : भारतातील प्रत्येक जिल्ह्यात बँकेची किमान एकतरी शाखा असावी, या उद्देशाने सध्या बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) काम करत आहे. आजच्या आधुनिक युगात ग्राहकांना तत्पर सेवा मिळाल्यास ग्राहक बँकेबरोबर जोडला जातो. त्यामुळेच स्वतः च्या विस्ताराच्या बरोबरीने ग्राहकाला जलदगतीने सेवा पुरविण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशीष पांडे यांनी व्यक्त केला.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने बँकेच्या ग्राहकांसाठी “ग्राहक संपर्क अभियान (Customer Outreach Program)” उपक्रमाचे आयोजन फातिमा नगर येथील केदारी गार्डन येथे करण्यात आले होते. या उपक्रमाला बँकेचे सुमारे १३० पेक्षा जास्त ग्राहकांनी भेट दिली. यावेळी सुमारे ७८ कोटी रुपयांचे मंजूर कर्ज प्रस्तावांचे वितरण आशीष पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे पुणे पूर्व विभागाचे विभागीयप्रमुख डॉ. जावेद क्यू. मोहमावी, कार्यकारी संचालक आशीष पांडे, पुणे पश्चिम विभागाचे विभागीयप्रमुख राहुल वाघमारे, पुणे शहरचे विभागीयप्रमुख व सरव्यवस्थापक राजेश सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. शिवंगी रॉय यांनी केले. प्रस्तावना विभागीय व्यवस्थापक डॉ. जावेद क्यू. मोहमावी यांनी तर आभारप्रदर्शन लोणी काळभोर शाखेचे व्यवस्थापक प्रद्युम्न कळसकर यांनी केले.

 २०२४ पर्यंत ५ लाख कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता

चालू आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र सुमारे ३.८० लाख कोटीपर्यंत व्यवसाय करणार आहे. त्यातच भारताच्या सुमारे १५० जिल्ह्यात बँकेच्या शाखा देखील स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे पुढील २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र सुमारे ५ लाख कोटींचा व्यवसाय करू शकेल, अशी शक्यता बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडे यांनी बोलताना व्यक्त केली.

 एनपीएमध्ये घट हीच बँकेवरील विश्वासाची पावती

अनेक बँका एनपीएमुळे अडचणीत आहेत, असे असताना देखील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एनपीएमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. एनपीए घटल्याने बँकेचा ग्राहकांवर व ग्राहकांचा बँकवरील विश्वास मजबूत होण्यास मदत होत आहे, असे बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडे यांनी सांगितले.