नानासाहेब पेशवे जाईल तिकडे ८ ते १० वर्षांच्या मुलीची मागणी करायचे; लेखक भालचंद्र नेमाडे काय म्हणाले

प्रसिद्ध लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी नानासाहेब पेशवे (Nanasaheb Peshawa) यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केले आहे. नानासाहेब पेशवे जाईल तिकडे ८ ते १० वर्षांच्या मुलीची मागणी करत होते, असे ते म्हणालेत. ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तरी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

भालचंद्र नेमाडे म्हणाले की, पंजाबच्या गोविंदपंत बुंधेले यांना नानासाहेब पेशवे यांचे पत्र यायचे. त्यात ते त्यांना ८ ते १० वर्षांच्या २ शुद्ध व सुंदर मुलींची तयार ठेवण्याचे निर्देश देत होते. ४० ते ४२ वर्षांचे नानासाहेब पेशवे या मुलींना मारून टाकायचे की काय हे मला माहिती नाही. या मुली त्यांना का लागायच्या हे मी सांगणार नाही. पण पेशवे खूप वाईट होते. आपण त्यांच्या तावडीतून सुटले हे खूप चांगले झाले. गोविंदपंत बुंधेले यांना मिळालेली पत्रं मी वाचलेली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी या प्रकरणी जोडली.

भालचंद्र नेमाडे पुढे म्हणाले की, आपल्याला माहिती असणारा इतिहास खरा नाही. दुसरे बाजीराव पेशवे खूप मोठे व्यक्ती होते. त्यांनी महाराष्ट्राला वाचवून इंग्रजांच्या स्वाधीन केले. पेशवे म्हणजे दुष्ट व निच वृत्तीचे लोक होते. खरा इतिहास वाचण्यासाठी आपल्याला पुस्तके वाचावी लागतील.

मी बालपणापासून जे काही वाचले, आईकडून महानुभाव, लीळाचरित्र ऐकून मोठा झालो. तुकारामांना वाचून आम्ही मोठे झालो. तुकाराम व श्री चक्रधर यांच्याशिवाय कोण मोठे आहे जगात. जे खरं आहे ते पाहायचं. त्यामुळे खरी माहिती आम्ही काढली. हे सगळे लोक बदमाश होते. त्यामुळेच इंग्रज आले. त्यांच्याकडे जहाजे होती. दारुगोळा होता. म्हणून ते येथे आली नाही. येथील लोकांना धडा शिकवण्यासाठी ते येथे आले. ते ही लोक बदमाश होतेच. पण येथील लोकांहून कमी होते, असेही नेमाडे यावेळी म्हणाले.