‘भुंकतोय जोमानं, अन् भिजलाय घामानं…’

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील संजय राऊत यांची खिल्ली उडवत जोरदार घणाघात केला आहे.

‘भुंकतोय जोमानं, अन् भिजलाय घामानं…’, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील संजय राऊत यांची खिल्ली उडवत जोरदार टोला लगावला आहे.’संजय राऊत हे भाजपमधील साडे तीन लोकांची नावं सांगणार होते. पण त्यातील स देखील बाहेर आला नाही. राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 चा गुन्हा दाखल करावा’. असा चिमटा संदीप देशपांडे यांनी काढला आहे.