भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही – थोरात

मुंबई –  केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असे विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह व केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.

प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, २० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणाशी काहीतरी करुन धागेदारे जुळवण्याचा प्रयत्न करुन नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधातील लढ्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी राजीनामे दिले होते काय? याचे आधी उत्तर द्यावे. ज्यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे.

सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरु झाले आहे. मंत्र्याला अशापद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केलेली असून हा चुकीचा पायंडा पाडला जातोय.