विधीमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा महाराष्ट्रद्रोह आहे – भाजपा 

Mumbai – विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असं आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की,  टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ… विधीमंडळ नाही ‘चोर’मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षानं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. असं राऊत म्हणाले.

राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र, या विधिमंडळाचा अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधीमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे.