‘साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको’ भातखळकरांनी उडवली कोल्हेंची खिल्ली

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काल खा. शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायची मनिषा बोलून दाखवली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

कोल्हे म्हणाले, जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.‘ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल. संसद भवनातला शिवरायांचा पुतळा सुद्धा याबद्दल समाधान व्यक्त करेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, कोल्हे यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यावरून विरोधक त्यांची खिल्ली उडवत आहेत. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कोल्हेंच्या या विधानावर तिरकस शब्दांत टीका केली आहे. ‘फरक आहे… पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको.’ असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी अमोल कोल्हे आणि शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे.