काँग्रेसचे २२ आमदार फुटणार; चंद्रकांत खैरे यांचा दावा 

औरंगाबाद – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील (Shinde Faction) 16 आमदार (शिंदे यांच्यासह) सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी (BJP Plan B) तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे हुशार आहेत, त्यांनी 22 काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी तयार केले आहे.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.त्यामुळे पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार का, या चर्चेला उधाण आलेय.

खैरे पुढे म्हणतात की, शिंदे यांचे चाळीस आमदार निवडून येणार नाहीत. भुजबळांसारखा माणूस पडतो. नारायण राणेंसारखा माणूस पडतो. मग हे कोण आहेत. आज त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आता पैसा गौण आहे. शेवटी लोक पाहतात कोणी खोके घेतले, कोणी काय केले ते. ठाण्यात ताकद होती तर आमचे ठाण्याचे सरकार त्यांच्याकडे का गेले नाहीत. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री पडले आहेत. हे पण पडतील, असा दावाही त्यांनी केलाय.