गतिमान निर्णय, वेगवान सरकार : समुद्रातील अनधिकृत थडग्याची चर्चा रंगली असताना भाजपचे लक्ष्यवेधी ट्वीट

Mumbai –  मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहिमच्या समुद्रात अवैध दर्गा उभारण्यात आल्याचं सांगितलं. ‘दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे,’ असं राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर मुंबई महापालिका, मुंबई जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सक्रिय झाले आहे. आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून मजार तोडण्यासाठी बीएमसीच्या मदतीने पोलिसांच्या फौजफाटासह कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. आज सकाळी 8 वाजता पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई सुरु केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया येत असून पक्षाच्या अधिकृत ट्वीटर अकौंट वरून याबाबत भाष्य करण्यात आले आहे. ज्या माहीमच्या समुद्रातील अनधिकृत थडग्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती, त्या अनधिकृत थडग्यावर तात्काळ कारवाई करत ते हटविण्याचे काम सुरु झाले आहे. "गतिमान निर्णय, वेगवान सरकार" असं भाजपने म्हटले आहे.