“जितेंद्र आव्हाड यांना मोक्का लावून तडीपार करा”, भाजपच्या तुषार भोसलेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई – रामनवमीच्या (Ramnavami) दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे. शुक्रवारी (२१ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ते बोलत होते. ईदच्या दिवशी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले आहे.

“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर भाजपा नेत्यांकडून टीका होताना दिसत आहे. अशातच आता भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.

तुषार भोसले म्हणाले की, जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस हा वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माला टार्गेट करत असतो आणि आता तर रमजानच्या वेळेलाच असं बोलले की राम नवमी आणि हनुमान जयंती दंगलीसाठीच असतात आणि येणाऱ्या वर्ष हे दंगलींचं वर्ष असेल, हे म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे. जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या सण, उत्सवांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोक्का लावून त्याला तडीपार करावं अशी आमची मागणी आहे.