‘तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे काहीच उरलं नाही…’; वडीलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावूक

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला शनिवारी (१२ ऑगस्ट) पितृशोक झाला. वडीलांच्या अचानक एक्झिटने अंकितासह तिच्या कुटुंबीयांवर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनानंतर नुकताच अंकिताने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट (Emotional Post) शेअर केली आहे.

वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे पूर्णपणे तुटली आहे. वडिलांच्या आठवणीत भावूक झालेल्या अंकिताने व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये पोस्टमध्ये तिने ‘आई- वडिलांची कधीच कोणी जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे जर कधी तुम्हाला त्यांची काळजी घेण्याची संधी मिळाली तर ती गमावू नका.’ अशा भावना देखील अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये मांडल्या आहेत.

अंकिता तिच्या इमोशनल पोस्टमध्ये म्हणते, “पप्पा, मी तुमचे वर्णन शब्दात करू शकत नाही. पण एवढेच सांगू इच्छिते की, मी माझ्या जीवनामध्ये तुमच्यासारखा मजबूत, उत्साही आणि मोहक व्यक्तीमत्त्व असलेली व्यक्ती पाहिलेली नाही. तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर मी तुमच्याबद्दल खूप काही जाणू शकले. तुम्हाला भेटायला आलेले सगळे लोकं फक्त तुमचीच स्तुती करत होते. तुम्ही कशाप्रकारे त्यांना रोज ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवतात, त्यांना कॉल करतात किंवा एखाद्याची आठवण आल्यावर त्याला न विसरता व्हिडीओ कॉल करता, हे सांगताना सर्वांनीच तुमची आठवण काढली. तुम्ही प्रत्येकासोबत नातं इतकं जिवंत ठेवलं होतं, आता मी पण तुमच्या स्वभावासारखी कशी आहे?, त्या प्रश्नाचं उत्तर मला आता कळालं. तुम्ही मला चांगलं आयुष्य, कधीही विसरणाऱ्या आठवणी आणि नातेसंबंधांविषयी खूप चांगली समजूत दिली.”