पुण्यातील डुप्लिकेट CM वर गुन्हा दाखल, ‘हे’ आहे कारण…

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन डुप्लिकेट सीएम विजय माने (Duplicate CM Vijay Mane) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत तोतयागिरी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात एकाने डुप्लिकेट सीएम बनत एकनाथ शिंदेंसारखा लुक बनवला आणि सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या इतरांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.