शिवसेना फोडल्यावर मुख्यमंत्र्यांची पूजा करायची का? चंद्रकांत खैरेंचा संतप्त सवाल

Chandrakant Khaire News : शिवसेनेचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात वक्तव्य करणं भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र हिम्मतराव जंजाळ यांनी खैरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ते म्हणाले आहेत की, ‘एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून लटकवुन मारले असते, तसेच अनेकदा बोके, चोर, रीक्षावाला असे शब्द वापरुन अपमानित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे चारित्र्यहनन व प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला आहे.’

आपल्या तक्रारीत ते पुढे म्हणाले आहेत की, ‘खैरे विविध माध्यमावर असंवैधानिक भाषेचा वापर करतात. तसेच दंगल घडविण्याच्या दृष्टीने दोन गटात भांडणे लावतात. दंगल घडविण्याचे उद्देशाने नेहमी वक्तव्य करणे व त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक बेकायदेशीर वर्तन ते करत असतात. यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विधानामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’

दरम्यान, या घडामोडींवर पुन्हा खैरे यांनी उर्मटपणे उत्तर दिले आहे. ‘शिवसेना फोडल्यावर मुख्यमंत्र्यांची पूजा करायची का? असा सवाल करत खैरे यांनी मुख्यमंत्र्यावर पुन्हा टीका केली. संपूर्ण देशात शिवसैनिक चिडलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी संपूर्ण संघटना फोडली. शिवसैनिक म्हणताहेत आम्ही कुठं जायचं? आमच्या पक्षाचं नाव गेलंय’. गद्दारांना क्षमा नाही असं आनंद दिघेंच्या सिनेमात दाखवलं. मी आंदोलनात्मक भाषेत त्यांच्या विरोधात बोललो. त्यात काय गैर आहे? ते आमच्या विरोधात बोलतात, त्याच प्रकारे बोललो’, असेही खैरे म्हणाले.