‘ज्यांच्या खानदानाने देशासाठी जीवन अर्पण केले त्यांना तुम्ही चौकशीला बोलावणे हे क्लेशदायक’

मुंबई – नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाकडून तिसऱ्या दिवशीही चौकशी सुरू आहे. त्याचवेळी राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या तपासाला कडाडून विरोध केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष मुख्यालयाबाहेर जमून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांवर धाडी टाकायच्या, आत टाकायच्या हे आता नवीन राहिले नाही. आता राहूल गांधी यांना तीन – तीन दिवस ईडी चौकशीला बोलवत आहे. त्यांच्या पणजोबाने निर्माण केलेली संस्था… त्यांनी देशाला सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या आजीने, वडीलांनी आपल्या देहाची कुर्बानी दिली. त्यांना तुम्ही चौकशीला बोलवत आहात. ही संस्था काय तुम्ही निर्माण केली त्या कॉंग्रेसच्या संस्था आहेत.

ज्यांच्या पूर्ण खानदानाने देशासाठी जीवन अर्पण केले आहे.पंडीत नेहरु यांनी बारा वर्ष जेलमध्ये काढले. करोडो रुपयांची संपत्ती असताना त्यांचे वडील श्रीमंतापैकी एक होते. बंगले अर्पण केले… देशासाठी ज्यांनी देह अर्पण केले त्यांच्या चौकशा केल्या जात आहे. हे मनाला दु:ख देणारे व क्लेशदायक आहे अशी खंतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.