नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा ? भुजबळांचा आघाडीतील घटक पक्षांना थेट इशारा

नाशिक : राज्यात येत्या काही दिवसांत महापालिका निवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत राज्यात सत्तेत असलेली महविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील होणार का ? हाच आता सर्वात मोठा प्रश्न दिसत आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मानस बोलून दाखवल्यावर आता तिकडे नाशिक मध्ये देखील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीवर जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिकेसाठी कंबर कसली असून आघाडीतील घटक पक्षांना थेट इशारा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. सर्वांची मते जाणून घेण्यात येत असून, सन्मानपूर्वक आघाडीस प्राधान्य देण्यात आहे. मात्र, आघाडी न झाल्यास स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी केली आहे, असा इशारा छगन भुजबळ यांनी आघाडीतील घटकपक्षांना दिला आहे.

लवकरच महानगरपालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. आगामी निवडणुका लढताना भाजप वगळता समविचारी पक्ष व गटांशी आघाडी करण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. मात्र, सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत असून, प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास करून नागरिकांची मते जाणून घेतली जात असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.