‘डॉ.प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जलदगतीने तपास करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा’

नाशिक :- डॉ.प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जलदगतीने तपास करून आरोपींना बेड्या घाला. तसेच त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना दिल्या आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिकच्या गोवर्धन परिसरात स्व.वसंतराव पवार यांच्या कन्या डॉ.प्राची पवार यांच्यावर काल अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामध्ये डॉ.प्राची पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सुश्रुत हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस करत पवार कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत डॉ.प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जलद गतीने तपास करत आरोपींना बेड्या घाला. तसेच त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.