‘हा विषय वाद अथवा राजकारणाचा नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा’, चित्रा वाघ यांचे सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या पेहरावावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आमने सामने आल्या आहेत. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणाऱ्या उर्फीला थोबडवून काढण्याची भाषा करणाऱ्या चित्रा वाघ यांना सुषमा अंधारे यांनी रोकडा सवाल केला होता.

‘जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत (Kangana Ranaut), केतकी चितळे (Ketaki Chitale) किंवा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.’ अशा तिखट शब्दांत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना झापले होते.

यावर आता चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. जिथे समाजस्वास्थ महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?
‘आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे’, असे चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

‘तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता,त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? स्री शिक्षित व्हाही,सक्षम व्हावी,यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का ? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?’

‘माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या.. छत्रपतींचा आदर्श,सावित्रीचे संस्कार जपू या.. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?’ असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच ‘व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.