चिंता वाढली! पुणे विमानतळावर आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे – पुणे विमानतळावर (Pune Airport) करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चाचणी करण्यात आला असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या BF.7 प्रकाराने (Corona BF.7 Varient) चीनमध्ये (China) खळबळ उडवून दिली आहे. या प्रकारामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग होत आहे. चीनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या घटना पाहता भारतातील (Corona In India) लोकही चिंतेत आहेत. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या या प्रकारामुळे भारतात कोरोनाची नवीन लाट येणार नाही. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक, बेंगळुरू येथील व्हायरोलॉजिस्ट डॉ व्ही रवी यांनी सांगितले की, भारतीय लोकसंख्येला या प्रकारापासून फारसा धोका होणार नाही. ते म्हणाले की सर्वात वाईट परिस्थितीत, या प्रकारामुळे, लोकांना एक किंवा दोन दिवस श्वसनाच्या किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते.