ठाकरेंसाठी मनोरुग्णालयात जागा ठेवा; शिंदेंच्या नातवावरील टीकेनंतर पुण्यात शिंदे समर्थक आक्रमक

पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) भाषणात मुलाचा उल्लेख केल्याने ते टीकेचे धनी बनले आहेत. अनेकांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) दुखावले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपला संताप आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

“ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. फेसबुकला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

दुसऱ्या बाजूला ठाकरेंची टीका शिंदे गटाला चांगलीच झोंबली असून पुण्यातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मनोरुग्णालयात एक जागा आरक्षित ठेवण्याचं पत्र लिहिलं आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आपल्या रुग्णालयात एक बेड आरक्षित ठेवा अशा आशयाचे पत्र पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना उद्देशून शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी लिहिलं आहे. यावरुन आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहे.