डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड

नवी दिल्ली – आज केरळमध्ये कन्नूर येथे पार पडलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाने निवडलेल्या नवीन केंद्रीय कमिटीने अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे ( Dr. Ashok Dhawale ) यांची पक्षाच्या १७ सदस्यांच्या नवीन पॉलिटब्युरोवर निवड केली आहे.

पक्षाच्या या महाअधिवेशनाने महाराष्ट्रातून पुढील आणखी ३ सदस्यांची ८५ सदस्यांच्या नवीन केंद्रीय कमिटीवर निवड केली आहे: १. जे. पी. गावीत, किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व यापूर्वी ७ वेळेस निवडून आलेले आमदार; २. मरियम ढवळे, राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना; ३. डॉ. उदय नारकर ( Dr. Uday Narkar ) , पक्षाचे नवीन महाराष्ट्र राज्य सचिव. पक्षाचे माजी महाराष्ट्र राज्य सचिव आणि सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम हे ७५ वर्षांच्या वयाच्या अटीमुळे या महाअधिवेशनात केंद्रीय कमिटीमधून सन्मानाने निवृत्त झाले.

डॉ. अशोक ढवळे हे माकपच्या पॉलिटब्युरोवर महाराष्ट्रातून निवडून आलेले तिसरे नेते आहेत. यापूर्वी पक्षाचे एक ‘नवरत्न’ आणि सीटूचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बी. टी. रणदिवे, आणि सीटूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. के. पंधे हे पक्षाच्या पॉलिटब्युरोचे अनेक वर्षे सदस्य होते.

२०१७ साली डॉ. अशोक ढवळे हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले महाराष्ट्रातील तिसरे नेते होते. यापूर्वी साताऱ्याच्या ब्रिटिशविरोधी ऐतिहासिक प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील आणि महाराष्ट्रातील अभूतपूर्व वारली आदिवासी उठावाच्या प्रणेत्या गोदावरी परुळेकर हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

डॉ. अशोक ढवळे यांनी मुंबई विद्यापीठातून एमबीबीएस आणि त्यानंतर एमए (राज्यशास्त्र) या पदव्या घेतल्या. विद्यार्थी जीवनात टी. एन. मेडिकल कॉलेज विद्यार्थी युनियनचे सरचिटणीस म्हणून, आणि नंतर मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर विद्यार्थी युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

१९७८ साली ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेत सामील झाले आणि १९८१ ते १९८८ या काळात ते एसएफआय च्या राज्य सरचिटणीसपदी व राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवडून आले. १९८९ ते १९९५ या काळात ते डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, नंतर राज्य अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. त्या काळात महाराष्ट्रात शिक्षण आणि रोजगाराच्या अनेकविध प्रश्नांवर विद्यार्थी-युवकांची हजारोंची स्वतंत्र व संयुक्त आंदोलने झाली.

उत्तुंग शेतकरी नेत्या गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेने डॉ. अशोक ढवळे सुमारे ३० वर्षांपूर्वी १९९३ साली अखिल भारतीय किसान सभेत सामील झाले, आणि आताच्या ठाणे व पालघर जिल्ह्यात त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांमध्ये काम सुरू केले. २००१ ते २००९ या काळात त्यांची महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या सरचिटणीसपदी, आणि २००३ ते २०१७ या काळात त्यांची अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय सहसचिवपदी निवड झाली. २०१७ मध्ये ते अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेले.

या काळात महाराष्ट्रात किसान सभेच्या नेतृत्वाखाली अनेक ज्वलंत प्रश्नांवर मोठी शेतकरी आंदोलने झाली. अलीकडच्या काही उदाहरणांमध्ये मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे १ लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम, ऑक्टोबर २०१६ मध्ये पालघर जिल्ह्यात वाडा येथे ५० हजार शेतकऱ्यांचा महाघेराव, जून २०१७ मध्ये राज्यात गाजलेला ११ दिवसांचा अभूतपूर्व शेतकरी संप, मार्च २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा ७ दिवसांचा, सुमारे २०० किलोमीटरचा, ४० हजार शेतकऱ्यांचा ऐतिहासिक किसान लॉंग मार्च, या लढयांचा समावेश आहे. या लढयांनी कर्जमाफी, वनाधिकार कायद्याची काही प्रमाणात अंमलबजावणी, वाढीव पेन्शन अशा शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या जिंकून घेतल्या. या लढयांचे नेतृत्व करणाऱ्या संचात माजी आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले आणि किसान सभेच्या इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हन्नन मोल्ला आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखालील किसान सभा २०१५ ते २०१८ या काळात भूमी अधिकार आंदोलन आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या अनेक मोठ्या देशव्यापी आंदोलनांचा अविभाज्य भाग होती.

२०२०-२१ मध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमांवर आणि देशभर एक वर्षभराचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यातही किसान सभा व तिचे नेतृत्व देशभर आघाडीवर होते. या जबरदस्त आंदोलनाच्या परिणामी मोदी सरकारला तीन शेतकरीविरोधी, जनताविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे कृषी कायदे रद्द करणे भाग पडले. उर्वरित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने जी ५ सदस्यांची समिती निवडली, तिचे एक सदस्य डॉ. अशोक ढवळे हे होते. या शेतकरी आंदोलनात ते देशभर फिरले आणि अनेक जंगी सभा व महापंचायतींना त्यांनी संबोधित केले.

महाराष्ट्रात या शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी १००हून अधिक शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी व सामाजिक संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी मिळून ‘संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा’ या मंचाखाली हजारोंच्या संयुक्त कृती यशस्वी केल्या. महाराष्ट्रातील सर्व डाव्या, प्रगतिशील व धर्मनिरपेक्ष पक्ष-संघटनांशी आणि व्यक्तींशी डॉ. अशोक ढवळे यांचे नेहमीच अत्यंत निकटचे संबंध राहिले आहेत.

डॉ. अशोक ढवळे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात १९७८ साली सामील झाले. १९७६ ते १९८३ ही ७ वर्षे वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर १९८३ साली त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः सोडून दिला आणि ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले.

१९८३ साली पक्षाच्या मुंबई जिल्हा कमिटीवर, १९८७ साली महाराष्ट्र राज्य कमिटीवर, १९९१ साली महाराष्ट्र राज्य सचिवमंडळावर, आणि १९९८ साली पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर त्यांची निवड झाली. २००५ ते २०१५ या काळात त्यांची पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदावर निवड झाली. आता २०२२ साली त्यांची पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड झाली आहे.

२०१० ते २०१९ या काळात माकपचे महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक मुखपत्र ‘जीवनमार्ग’चे ते संपादक होते. ‘जीवनमार्ग’ तसेच पक्षाची केंद्रीय मुखपत्रे ‘पीपल्स डेमोक्रॅसी’ (इंग्रजी) आणि ‘लोकलहर’ (हिंदी) साठी ते गेली ४० वर्षे नियमित लिखाण करत आले आहेत. महाराष्ट्रातील पक्षाचे प्रकाशन गृह ‘जनशक्ती प्रकाशना’चे ते अध्यक्ष आहेत. या प्रकाशन गृहाने विविध विषयांवर ५०हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. पक्षाचे केंद्रीय वैचारिक त्रैमासिक ‘द मार्क्सिस्ट’च्या संपादक मंडळाचे ते सदस्य आहेत.

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांत ‘शहीद भगतसिंग : एक मृत्युंजयी क्रांतिकारक’, ‘कॉ. शामराव व कॉ. गोदावरी परुळेकर : असामान्य कर्तृत्वाचे क्रांतिकारक जीवनकार्य’, ‘ समाजवादी चीन : काल-आज-उद्या’, ‘महाराष्ट्रातील किसान लॉंग मार्च’ आणि नुकतेच ‘लेफ्टवर्ड बुक्स’ने प्रसिद्ध केलेले आणि ह्याच पक्ष महाअधिवेशनात सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या हस्ते प्रकाशित केलेले ‘व्हेन फार्मर्स स्टुड अप’ या अलीकडच्या ऐतिहासिक शेतकरी संघर्षावरील पुस्तकाचा समावेश आहे.

डॉ. अशोक ढवळे यांनी महाराष्ट्रात आणि देशभर गेली अनेक वर्षे महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक विषयांवर शेकडो राजकीय-वैचारिक शिबिरे घेतली आहेत व आजही घेत आहेत. राज्यात आणि देशात अनेक परिसंवादात त्यांनी भाग घेतला आहे.