‘राहुल कनाल हा पेंग्विनचा पुरवठामंत्री आहे’, निलेश राणेंचा प्रहार

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली.

आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.

यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, या कारवाईवर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘आयकर विभागासह नारकोटिक्स डिपार्टमेंट आणि वुमन राईट कमिशन विभागाने पण या राहुल कनालच्या घरावर आणि ऑफिसवर छापे मारले पाहिजे. पेंग्विनचा पुरवठामंत्री आहे हा.’ असं निलेश राणे म्हणाले आहेत.