मोदींच्या राजवटीत शेतकरी, कष्टक-यांच्या तपस्येला फळ मिळत नाही : राहुल गांधी

नांदेड – हा देश तपस्वींचा आहे, महापुरुषांबरोबरच शेतकरी, कष्टकरी हेसुद्धा तपस्या करत आहेत पण मोदींच्या राजवटीत त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी, कामगार यांच्या खिशातून मोदी खो-याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देऊन टाकतात पण शेतक-यांना कर्जमाफी मिळत नाही, असा घणाघाती हल्ला खा. राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला.

नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेसाठी भव्य व्यासपीठ बनवण्यात आले होते. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राहुल गांधी व मान्यवर नेत्यांनी अभिवादन केले.

जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, नोटबंदींचा निर्णय चुकला तर मला चौकात फाशी द्या असे मोदी म्हणाले, डोळ्यात अश्रूही आले पण नोटबंदी अपयशी ठरली, काळा पैसा संपला का ? पंधरा लाख रूपये आले का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत. पंधरा लाख जसे गायब झाले तसेच हे उद्योगही गायब झाले.