त्रयस्थ यंत्रणा नेमून सरकारने खुशाल चौकशी करावी आणि महिन्याभरात निकाल द्यावा : बावनकुळे

मुंबई : गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चोकशी करवून काय मिळणार आहे ? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, अशी मागणी राज्याचे माजी उर्जामंत्री, भाजपा नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऊर्जा मंत्रीपदाच्या काळातील कामांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून यासंदर्भात त्यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा.

आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चौकशीमागे खाजगीकरणाचा वास येत असल्याचा संशय व्यक्त केला. चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील १६ शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा असा यामागचा प्रयत्न असू शकतो असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र केला. एक शेतकरी – एक डीपी योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखवला. आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली. आमच्या सरकारनेच एलीफेंटाला वीज पोहोचवली. राज्यातील ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन मिळवून दिले. ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज दिली असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण इतके चांगले काम करुनही आत्ताच चौकशी का ? असा प्रश्न आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.