मोदींच्या कार्यक्रमांची सामनात पानभर जाहिरात; नवनाथ बन यांनी राउतांना धुतलं 

Narendra  Modi inaugurate Mumbai Metro Live updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतल्या सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मेट्रो मार्गिका 2- अ आणि 7 चं लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नव्या ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महापालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन, सुमारे 400 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन असे विविध कार्यक्रम यावेळी होतील. तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते  होणार आहे.

दरम्यान, या दौऱ्यावरून ठाकरे गट आणि त्यातही खासदार संजय राऊत  सातत्याने भाजपा लक्ष्य करत असताना दिसत आहेत. मात्र एका बाजूला राऊत टीका करत असताना दुसऱ्या बाजूला सामनाच्या आजच्या अंकाच्या पहिल्या पानावर मोदींची जाहिरात देण्यात आली आहे. यावरूनच आता भाजप नेते  नवनाथ बन (Navnath Ban )  यांनी राऊत यांना लक्ष्य केले आहे.

सामना दैनिकात पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारच्या मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात. हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणणारे कार्यकारी संपादक संजूभाऊ ही जाहिरात प्रसिद्ध करताना रजेवर होते का? कथित घटनाबाह्य सरकारची जाहिरात चालते का? असा खोचक सवाल बन यांनी केला आहे.