हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील; इम्तियाज जलील यांचा अजब दावा 

औरंगाबाद – हिजाबबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले की, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही आणि शालेय विद्यार्थी गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत. यासोबतच महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी मुस्लिम विद्यार्थिनींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.हिजाब बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. हिजाब बंदीमुळे मुस्लीम मुली शिक्षणापासून दूर जातील असे मत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा आणि त्याच्या मतानुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.

हिजाबबाबत उच्च न्यायाल्याने दिलेला निर्णय निराशाजनक आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असेलच असे नाही. त्यामुळं जर कोणी सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ, असेही  इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. हिजाब बाबत राजकीय वातावरण तयार करण्यात आले. उद्या राजस्थानमधील महिलांना सुद्धा तुम्ही डोक्यावर पदर घेऊ नका म्हणून सांगताल, असंही जलील म्हणाले.