हिंदवी स्वराज्य हे फक्त हिंदूंचेच नाही तर सर्व जाती-धर्मीयांचे होते – रामदास आठवले

मुंबई – अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातून जगाला लोककल्याणाचा आदर्श मार्ग शिकविला. दलित-मुस्लिमांसह सर्व जाती-धर्मीयांना एकत्र सोबत घेणारे, सर्वधर्म समभाव बाळगणारे, सर्वांना समान सन्मानाची वागणूक देणारे, समतेचा द़ृष्टीकोन बाळणारे, परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण देणारे, प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्व जगाने घेण्यासारखा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय न्याय राज्यमंत्री   रामदास आठवले यांनी केले.

बांद्रा, मुंबई येथील आठवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जशी बलात्कारी गुन्हेगारास हातपाय तोडून कडेलोट करण्याची शिक्षा दिली जात होती तशीच शिक्षा आताच्या राज्यकर्त्यांनी सुरू करावी. त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार रोखले जातील, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहित दक्ष राजे होते. त्यांच्या स्वराज्यात  शेतकऱ्यांना न्याय दिला जात होता. कष्टाने पिकविलेल्या भाजीच्या देठालाही हात लावला जात नव्हता. लाचलुचपत, भ्रष्टाचाराला शिवरायांच्या स्वराज्यात स्थान नव्हते. हिंदवी स्वराज्य हे फक्त हिंदूंचेच नाही तर सर्व जाती-धर्मीयांचे होते, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय न्याय राज्यमंत्री   रामदास आठवले यावेळी म्हणाले.