40 आमदार फोडण्यासाठी भाजपाचे 800 कोटी रुपये तयार; अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षातील संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) आपला पक्ष फोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यासाठी भाजपाने पैसेही तयार ठेवल्याचं ते सांगतात.

आपच्या (Aam Aadmi Party) आमदारांना फोडण्यासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांचे आमिष दाखविले जात आहे. 40 आमदारांना फोडण्यासाठी भाजपने 800 कोटी रुपये तयार ठेवले असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी केला.

गैरव्यवहाराच्या आकेडवारीवरून केजरीवाल यांनी भाजपची खिल्ली उडवली

‘दीड लाख कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. प्रत्यक्षात दिल्लीचा अर्थसंकल्प ७० हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र हा नेमका गैरव्यवहार काय आहे हे भाजपच्या नेत्यांना सांगता येत नाही,‘ असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, की भाजपचा एक नेता आठ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हणतो, तर भाजपच्या दोन नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अकराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा दावा केला. नायब राज्यपालांनी १४४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला. ”सीबीआय”ने (CBI) गुन्हा नोंदवताना त्यात एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचे म्हटले आहे. खरोखर काही गैरव्यवहार आहे की सारे काही तथ्यहीन आहे… आपच्या ४० आमदारांसाठी ८०० कोटी रुपये भाजपने तयार ठेवले आहेत. ही रक्कम जीएसटीची (GST) आहे, पीएमकेअरची आहे की कोणत्या मित्राने दिली आहे?