मी ख्रिश्चन आहे, परंतु तरीही हिंदू धर्माबाबत आपुलकी  आहे, जो एक महान धर्म आहे – न्यायमूर्ती  के एम जोसेफ

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केएम जोसेफ यांनी सोमवारी सांगितले की, मी ख्रिश्चन(Christian) आहे, परंतु तरीही हिंदू (Hindu) धर्माबाबत आपुलकी  आहे. जस्टिस जोसेफ यांनी देशातील प्राचीन, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची मूळ नावे पुनर्संचयित करण्यासाठी नामांतर आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे भाष्य केले.

न्यायमूर्ती जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न यांचाही समावेश होता. न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले, “मी ख्रिश्चन आहे, तरीही मला हिंदू धर्माबद्दल आपुलकी आहे, जो एक महान धर्म आहे आणि त्याचा अवमान होऊ नये. हिंदू धर्म ज्या उंचीवर पोहोचला आहे आणि उपनिषद, वेद आणि भगवद्गीतेमध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या उंचीवर कोणतीही व्यवस्था पोहोचलेली नाही. हिंदू धर्माने अध्यात्मिक ज्ञानात खूप उंची गाठली आहे. या महान धर्माचा आपल्याला अभिमान असायला हवा आणि तो आपण कमी होऊ देऊ नये.

ते म्हणाले, “आपल्या महानतेचा आपल्याला अभिमान असायला हवा आणि आपली महानता आपल्याला उदार बनवते. मी ते वाचण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही डॉ. एस. राधाकृष्णन यांचे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानावरील पुस्तकही वाचावे. केरळमध्ये असे अनेक राजे आहेत ज्यांनी चर्च आणि इतर धार्मिक स्थळांसाठी जमीन दान केली. न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, धार्मिक पूजेचा रस्त्यांच्या नामकरणाशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले की, मुघल सम्राट अकबराने विविध समुदायांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.