दिपाली सय्यद यांच्याकडे येणारा पैसा डॉन दाऊद इब्राहिमचा, सहकाऱ्याचा गंभीर आरोप

मुंबई- शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी रविवारी दि. २५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या महिलेचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Don Dawood Ibrahim) संबंध असल्याचा आरोप केला. शेवाळेंनी दाऊद कनेक्शन, पाकिस्तानी मैत्रीण, कराचीला भेट असे अनेक आरोप यावेळी केले. एकीकडे या प्रकरणाच्या जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अहमदनगर- सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब शिंदे हे दिपाली सय्यद यांच्याबाबत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. दिपाली सय्यद यांच्या दुबई आणि पाकिस्तान कनेक्शनबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता.

यानंतर आता भाऊसाहेब शिंदे यांनी दिपाली सय्यद यांच्याकडे येणारा पैसा दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या हत्येचा कटही दिपाली सय्यद यांनी रचला होता, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. न्यूज १८ ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

भाऊसाहेब शिंदे हे दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत. दोन आठवड्यापूर्वीच त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांच्या या खुलास्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.