अरेरे! राज ठाकरे यांना धमकी देणाऱ्या बृजभूषण शरण सिंह यांचे शिवसेनेने केले कौतुक

नवी दिल्ली – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या अयोध्या दौऱ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी या दौऱ्याला विरोध केल्याने या दौऱ्याची बरीच चर्चा होत आहे. हा विरोध करताना बृजभूषण शरण सिंह  राज ठाकरे या मराठी नेत्याच्या विरोधात गरळ ओकताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांसाठी मागे घेतलेल्या भूमिकेमुळे बृजभूषण शरण सिंह त्यांना विरोध करत आहे.

खरतर मराठी माणसासाठी खंबीर भूमिका घेणाऱ्या एका मराठी नेत्याला बृजभूषण शरण सिंह उघडपणे धमक्या देत असताना शिवसेनेने आता चक्क याच बृजभूषण शरण सिंह यांची तळी उचलली आहे.  उत्तर प्रदेशातील जनतेच्या भावनांचा उद्रेक एखादा नेता करत असेल तर त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. राज ठाकरेंनी पूर्वीची भूमिका होती ती का सोडली माहिती नाही. हिंदी भाषिकांविरोधात भूमिका घेतली होती. मराठी अस्मितेबद्दल बोलत होते, मग अचानक एका रात्रीत हिंदुत्व आठवले आणि अयोध्येला निघाले अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात शिवसेनेने त्यांचे कौतुक केले आहे.

त्याचसोबत साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना राऊतांनी म्हटलं की, या देशात साधू कोण आहे? कोणीही उठतो साधू बनतो असं नाही. साधू ही वृत्ती अंगात असावी लागते. जटा वाढवल्याने कुणी साधू बनत नाही. आमचा अयोध्येतील दौरा राजकीय नाही. अयोध्येशी शिवसेनेचं नातं घट्ट आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत घर घेतले, आश्रम बांधले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.