गरज भासल्यास परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार; करुणा मुंडे यांचा एल्गार

नगर – सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी शिवशक्ती पक्षाची घोषणा नगरमध्ये केली. वेळ पडली तर मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असा इशाराही त्यांनी दिला.

अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत” असा दावाही करुणा यांनी केला.

अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा यांनी दिली आहे.

महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणे, गोरगरीबांवरील अन्याय दूर करणे या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात येत आहे. गेल्या २५ वर्षांपासून आपण अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल असं देखील त्यांनी सांगितले.