टी20 रँकिंगमध्ये भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवची गरुडझेप, अव्वलस्थानी घेतली उडी

आयसीसीने टी20 क्रमवारी (ICC T20 Ranking) जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकादरम्यान (T20 World Cup 2023) त्याने हे मानांकन मिळवले होते. तेव्हापासून तो सातत्याने चांगली खेळी खेळत आहे. याशिवाय शुभमन गिलच्या टी20 क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. त्याने टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत 43 स्थानांची झेप घेतली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 मालिकेनंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

सूर्यकुमारने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत चार डावात 166 धावा केल्या, त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने अव्वल स्थानावर चांगली आघाडी कायम ठेवली आहे. त्याचे रेटिंग दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानपेक्षा 96 गुणांनी अधिक आहे. सूर्याचे 907 रेटिंग गुण आहेत आणि रिझवानचे 811 रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम 756 रेटिंग गुणांसह टी20 फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम चौथ्या आणि रायली रुसो पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर शुभमनने 43 स्थानांची झेप घेत फलंदाजांमध्ये 25व्या स्थानावर पोहोचला आहे. विंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याने 102 धावा केल्या होत्या. शुभमनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात 77 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली होती.