‘BMC मध्ये  शिवसेनाच वसुली करत होती आणि  भाजप नेते तेथे तपश्चर्या करायला बसले होते, असे म्हणता येणार नाही’  

पुणे महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहार भ्रष्टाचार संहारक किरकिटभाईंना दिसला नाही ?

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (yashwant jadhav), त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्या निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. याच डायरीतील एक उल्लेख राज्यभरात सध्या चर्चिला जात आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर आता भाजपकडून  शिवसेनाला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार हेमंत देसाई (hemant desai) यांनी फेसबुक पोस्टमधून(Facebook post) आपले मत व्यक्त केले असून भाजपची पोलखोल केलेली आहे.

ते म्हणाले, मुंबई महापालिकेत (BMC ) यशवंत जाधव यांनी प्रताप केले आहेतच. रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शैलेश फणसे, सदा सरवणकर या शिवसेनेच्या नेत्यांनीही स्थायी समितीत कर्तृत्व गाजवले आहे. पण सुधार समिती, बेस्ट समिती या आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समित्या असतात आणि युती असताना या तसेच शिक्षण, आरोग्य वगैरे समित्या भाजपकडे असायच्या. मनोज कोटक ,आशिष शेलार, पराग अळवणी, भालचंद्र शिरसाट, राम बारोट असे भाजपचे नेते विविध समित्यांचे नेतृत्व करून वा सदस्य म्हणून आपल्यामध्ये ‘सुधार’ घडवून आणत होते. बिल्डर्स वा खाजगी जमीन मालकांची ये जा कोणाकडे असायची, ते अनेकांना ठाऊक आहे. शिवाय स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे असले, तरी या समितीत भाजपचे तसेच अन्य पक्षांचे देखील सदस्य असतातच. स्थायी समितीला विलासराव देशमुख ‘अंडरस्टँडिंग कमिटी’ असे म्हणत असत! भाजपतील अनेक उपक्रमशील व उद्योगी नेत्यांचा उत्कर्ष या समित्यांच्या माध्यमातूनच झाला.

भूखंडांचे व्यवहार सुधार समितीच्या माध्यमातूनच होत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेत फक्त शिवसेनाच वसुली करत होती आणि अन्य पक्ष आणि विशेषतः भाजप नेते तेथे तपश्चर्या करायला बसले होते, असे म्हणता येणार नाही. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून, तेथील कथित गैरव्यवहार भ्रष्टाचार संहारक किरकिटभाईंना दिसला नाही. पिंपरी चिंचवडमधील स्थायी समितीच्या संस्कारी अध्यक्षाला तर अटकच झाली आहे. महाविकास आघाडी सरकारची अथवा त्यातील पक्षाच्या नेत्यांची ‘कलंकशोभा’ झाली, तर ते नाटक बघायला ज्यांना बरे वाटते, त्यांना याच नाटकाच्या अन्य प्रयोगांत आपणही अदृश्य राहून काम करत आहोत याचा विसर पडलेला असतो! असं देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.