निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार, हेमंत रासने यांची घोषणा

Pune: पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी (Kasba Bypoll Election) अवघे काही दिवस उरले आहेत. २६ फेब्रुवारी मतदान होणारी ही पोटनिवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी, दोन्हीही पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) हे स्वत: जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न विचारात घेताना दिसत आहेत. अशातच भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत शनिवारवाडा (Shaniwar Wada) आधी होता तसा पुन्हा करण्याचे आश्वासन दिले.

‘लोकसत्ता’शी बोलताना हेमंत रासने यांनी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा केली. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी रासने यांनी दिले. यावेळी बोलताना त्यांनी शनिवार वाडा आधी होता तसा पुन्हा सात मजली उभारणार असल्याची घोषणा केली.

मी २०१२ साली नगरसेवक आणि स्टँडिंग कमिटीचा सदस्य होतो. त्यावेळी मी शनिवारवाडा आधीसारखा सात मजली बांधावा याचा ठराव मी मान्य केला होता. परंतु एखादी योजना किंवा संकल्पना राबवण्यासाठी तुम्हाला त्याच सभागृहात जावे लागते. त्या सभागृहात राहून तुम्हाला त्या योजना राबवण्यासाठी पाठपुरावा करता येतो. उदाहरणार्थ, १० रुपयांमध्ये बस. ही संकल्पना खूप वर्षांपासून माझ्या डोक्यात होती. परंतु मी जेव्हा स्थायी समितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा मी या संकल्पनेची अतिशय प्रभावीपणे अंंमलबजावणी केली.

अगदी याचप्रमाणे जर मी कसब्यात निवडून आलो तर मी शनिवारवाडा पुन्हा आधी होता तसा सात मजली करण्याची माझी संकल्पना सत्यात उतरवेल, असे आश्वासन हेमंत रासने यांनी दिले.