भाजपमधून तिकीट मिळवायचे असेल तर आता नेत्यांच्या मुलांना करावे लागणार ‘हे’ काम

नवी दिल्ली – केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व भक्कम असल्याने अनेकांना या पक्षात आपले भविष्य दिसत आहे. यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय घराण्यातील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता ही बाब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आली असून आगामी काळात पक्षात कुणाला तिकिटे दिली जातील याबाबत एक धोरण ठरविण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपची आगामी काळातील वाटचाल कशी असेल आणि घराणेशाहीबाबत त्यांना काय वाटते यावर त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, घराणेशाहीची संकल्पना काय असते? तर संबंधित पक्षांत वडील-आई अध्यक्ष, मुलगा किंवा मुलगी उपाध्यक्ष, सरचिटणीस. विरोधी पक्षनेते इत्यादी, संसदीय मंडळात काका, काकू, बहीण, जावई अशी रचना हीच घराणेशाही आहे. भाजप असे करणार नाही.

नेत्यांच्या मुलांना तिकिटे हवी असतील तर आधी पक्षसंघटनेत काम करावे लागेल, ‘एक व्यक्ती एक पद’ हे पक्षाचे धोरण आहे. त्यानुसार एका व्यक्तीला एकच जबाबदारी मिळेल. महापालिका निवडणुकांतही हेच सूत्र पक्षनेत्यांच्या मुलांबाबत लागू होईल असं ठामपणे नड्डा यांनी सांगितले आहे.