भाजपला घेरण्याची विरोधकांची तयारी; २३ तारीख महत्वाची, अवघ्या देशाचे असणार लक्ष 

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा देशभरात प्रचाराचा कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान, 23 जून रोजी पाटण्यात विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. याआधी मंगळवारी (13 जून) विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले.

तामिळनाडूचे वीजमंत्री सेंथिल बालाजी यांच्या निवासस्थानावर मंगळवारी ईडीने टाकलेल्या छापेवर सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी एकाच आवाजात टीका केली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सेंथिल बालाजी यांना नुकतीच मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे आणि भाजपवर केंद्रीय एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या विषयावर एकजूट दाखवल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “विरोधी पक्षांच्या मंत्र्यांवर ईडीच्या सततच्या कारवाईचा मी तीव्र निषेध करतो. सेंथिल बालाजीच्या कार्यालयावर छापे टाकून, ईडी आता दक्षिण भारतातील अलोकतांत्रिक केंद्र सरकारविरोधात आवाज दाबण्याच्या मार्गावर आहे.”