ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयासह राज्यात आघाडीवर: नाना पटोले

Grampanchayat Election: राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपने केलेले दावे साफ खोटे असून हिम्मत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत, त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी मग कळेल जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला आहे. मागील वर्षी झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही भाजपाने असाच खोटा दावा केला होता वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्रपक्षांचाच विजय झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत. नागपूर जिल्ह्यातही भाजपाचा सुपडासाफ झालेला आहे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आतापर्यंत २३ ग्रामपंचयातीवर काँग्रेसने दणदणित विजय मिळवला असून भाजपाच्या वाट्याला फक्त २ ग्रामपंचायती आल्या आहेत तरीही ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत.

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढाव्या लागल्या त्याला भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. फडणवीस व भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. सत्तेवर आलो तर २४ तासात ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण दीड वर्षात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण दिले नाही याचे उत्तरही जनतेने भाजपाला दिले आहे. राज्यातील जनतेने भाजपाचा खोटारडा चेहरा उघडा पाडला आहे. महाराष्ट्रात सर्वच भागात काँग्रेसचा प्रभाव आहे.
अजित पवार महायुतीत आल्याने फायदा झाल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीला जर फायदा झाला असेल तर मग विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घेण्याची हिम्मत का दाखवत नाहीत. तिन तिघाडा आणि काम बिघाडी, अशी त्यांची अवस्था आहे. चिन्हावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास ते का घाबरता आहेत?

राज्यात दुष्काळ असून केवळ ४० तालुक्यातच सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दिवाळी तोंडावर आली आहे पण शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही, अवकाळीची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही, ५० हजार रुपयांची प्रात्सोहनपर मदतही दिलेली नाही. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या प्रचार सभेत धानाला ३१०० रुपये हमी भाव देण्याची घोषणा करतात, देशभरात धानाला २४०० रुपये हमीभाव आहे. मग पंतप्रधान केवळ छत्तिसगडमध्येच ३१०० रुपयांचा भाव का देतात, देशभरातील शेतकऱ्यांना का देत नाहीत? ५०० रुपयांना सिलिंडर देण्याची भाषाही फक्त निव़डणुका असलेल्या राज्यातच का करता देशभर ५०० रुपयांना सिलिंडर का देत नाहीत, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी